कारदगा ग्रामपंचायत अध्यक्षपदी अलंकार तर उपाध्यक्षपदी टाकळे
कारदगा येथील ग्रामपंचायतीच्या माजी अध्यक्षा सुजाता वडर व उपाध्यक्ष निवधुत धनगर यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी ता. २८ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक प्रक्रिया पार पाडली.यामध्ये अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व तिसरी आघाडी अशा समविचारी आघाडीच्या पद्मावती अलंकार व भाजपच्या वैशाली खराडे यांनी तर उपाध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व तिसरी आघाडी अशा समविचारी आघाडीचे किरण टाकळे व भाजपचे सुखदेव माळी यांनी निर्धारित वेळेत अर्ज दाखल केले होते. त्याप्रमाणे निवडणूक होऊन समविचारी आघाडीच्या पद्मावती अलंकार या अध्यक्ष म्हणून एक मतांनी तर उपाध्यक्ष म्हणून समविचारी आघाडीचे किरण टाकळे एक मतांनी विजयी झाले. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून आप्पासो पुजारी यांनी काम पाहिले. प्रारंभी ग्राम विकास अधिकारी नंदकुमार फपे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. त्यानंतर निवडणूक अधिकारी आप्पासो पुजारी यांनी निवडणुकीची प्रक्रिया सांगितली. सदर निवडीनंतर माजी ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, विद्यमान ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष व निवडणूक अधिकारी आप्पासो पुजारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तिसऱ्या आघाडीचे व समविचारी आघाडीचे ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.