मुख्याध्यापक बापाच्या अमानुष मारहाणीत मुलीचा मृत्यू ; ‘नीट’ परीक्षेत कमी गुण पडल्याचा संताप आटपाडी तालुक्यातील नेलकरंजीत हृदयद्रावक घटना
सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात नेलकरंजी येथे घडलेली एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. 'नीट' परीक्षेच्या चाचणीत कमी गुण पडल्याने मुख्याध्यापक पित्याने आपल्या मुलीला अमानुष मारहाण केल्याने तिचा मृत्यू झाला. साधना धोंडिराम भोसले (वय १९) असे मृत मुलीचे नाव आहे. धोंडिराम भोसले हे नेलकरंजी येथील माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक असून त्यांना दोन अपत्ये आहेत. साधनाने दहावीला ९५ टक्के गुण मिळवून उज्वल यश संपादन केले होते. ती सध्या आटपाडीतील निवासी विद्यालयात बारावीला शिकत होती. नुकत्याच झालेल्या ‘नीट’ चाचणी परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने ती वडिलांच्या रागाचा बळी ठरली. शुक्रवारी रात्री संतप्त धोंडिरामने घरातील जात्याच्या लाकडी खुंट्याने साधनावर अमानुष मारहाण केली. डोक्याला आणि शरीराला गंभीर इजा झाल्यानंतरही तिला रुग्णालयात नेण्यात आले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मुख्याध्यापक धोंडिराम योग दिनाच्या कार्यक्रमाला गेला होता. घरी आल्यावर मुलगी बेशुद्ध आढळली. तिला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. या प्रकरणी आटपाडी पोलिसांनी धोंडिराम भोसले याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.