जोतिबाचा डोंगर तीन लाख भाविकांनी फुलला
दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या पौर्णिमा यात्रेचा उद्या मंगळवार हा मुख्य दिवस असून सोमवार रात्रीपर्यंत तीन लाख भाविक दाखल झाले आहेत. चैत्र यात्रेचे मुख्य आकर्षण असणाऱ्या सासनकाठी मिरवणुकीसाठी मानाच्या सासन काठया जोतिबा डोंगरावर दाखल झाल्या आहेत . चांगभलंच्या गजराने अवघा जोतिबाचा डोंगर दुमदुमून गेला आहे. डोंगर वाटा भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्या आहेत. बैलगाडी, खाजगी वाहनातून पायी चालत भाविक जोतिबा डोंगरावर आले आहेत . जोतिबा मंदिरात पहाटे तीन पासून धार्मिक विधी सोहळ्यास प्रारंभ होईल . पाच वाजता शासकीय महाभिषेक पन्हाळा तहसिलदार यांचे हस्ते होईल. १० वाजता धुपारती सोहळा होईल. जोतिबा डोंगरावरील सासन काठयाची मिरवणुक मुख्य आकर्षण असते. दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे हस्ते मानाच्या पहिल्या सासनकाठीच्या पुजनाने मिरवणुकीस प्रारंभ होईल चैत्र यात्रेत गुलाल-खोबरे, बंदी नाणी यांची पालखीवर होणारी उधळण अनोखी असते. सासनकाठ्या चाळीस फूट उंचीच्या असतात. रंगीबेरंगी कपड्यांनी सजविलेल्या सासनकाठ्या आकर्षक व सुंदर दिसतात. काही काठ्यांना नोटांच्या माळा, फुलांच्या माळा असतात. हलगी, पिपाणी, तुतारी, सनईच्या तालावर काठ्या विशिष्ट पद्धतीने नाचविल्या जातात. भर उन्हात तरुण वर्ग, गुलालात चिंब होऊन नाचतो. सर्वांच्या मुखात जोतिबाच्या नावानं चांगभलचा अखंड गजर असतो. दुपारी १२ वाजता सासनकाठीच्या मिरवणुकीस प्रारंभ होईल मानाच्य एकूण १०८ सासनकाठ्या सहभागी असतात. या मिरवणुकीमध्ये २० फुटांपासून ते ७० ते ८० फुटांच्या उंचच उंच सासनकाठ्या सहभागी असतात. हस्तनक्षत्रावर सांय ५ . ४५ वाजता श्री . जोतिबाचा पालखी सोहळा निघेल. यावेळी तोफेच्या सलामीने जोतिबा मंदिरातून यमाई मंदिराकडे पालखी मार्गस्थ होईल .सायंकाळी साडेसहा वाजता यमाई मंदिरात यमाईदेवी व जमदग्नी यांच्या विवाह सोहळ्याचा धार्मिक विधी होईल. श्री जोतिबा मंदिरात येऊन तोफेच्या सलामीने रात्री दहा वाजता पालखी सोहळ्याची सांगता होईल.