पॉलिश करण्याच्या बहाण्याने चोरट्याने २ लाख २५ हजाराचे दागिने हातोहात लंपास केल्याची घटना खोतवाडी येथे घडली. या प्रकरणी शहापूर पोलिसात छाया धर्मेंद्र कांबळे वय ३८ रा.शिंदे मळा यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, खोतवाडी येथील छाया कांबळे यांच्या घरी २७ रोजी अज्ञात व्यक्ती आली. त्या व्यक्तीने कांबळे यांचे चांदीचे पैंजण, जोडवी व अंगठ्या पॉलिश करुन देत त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर थोड्या वेळानंतर पुन्हा त्या व्यक्तीने छाया कांबळे यांना केवळ तुमचेच सोन्याचे दागिने पॉलिश करुन देतो असे सांगत पाणी गरम करण्यास सांगितले. गरम पाण्यात एक केमिकल टाकून त्यामध्ये कांबळे यांच्याकडील १ लाख ५० हजार रुपये किंमतीचे तीन तोळ्याचे गंठण व ७५ हजार रुपये किंमतीचे दीड तोळ्याचे जोंधळ पोत घेऊन ते त्या भांड्यात टाकल्यासारखे करत लपवून ठेवले. काही वेळानंतर ती व्यक्ती निघून गेल्यानंतर कांबळे यांनी भांड्यात पाहिले असता दागिने मिळून आले नाहीत. त्यामुळे फसवणूक प्रकरणी त्यांनी शहापूर पोलिसात फिर्याद दिली आहे.