सांगलीच्या वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी येथील कंत्राटदाराची आत्महत्या

सांगलीच्या वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी येथील कंत्राटदाराची आत्महत्या

जल जीवन मिशन योजनेतील कंत्राटदाराने आत्महत्या केल्याची माहिती उघडकीस आली आहे. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी येथील ३५ वर्षीय कंत्राटदाराने गळफास घेत आत्महत्या केली. १ कोटी ४० लाख रुपयांची रक्कम शासनाकडे थकीत असल्याने कंत्राटदाराने टोकाचा निर्णय घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या करणाऱ्या कंत्राटदाराचे नाव हर्षल असे आहे. जल जीवन मिशन योजनेचे काम पूर्ण करुन देखील एका वर्षापासून कामाचे पैसे मिळत नसल्याच्या कारणातून हर्षलने स्वतःचे जीवन संपवले, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बिले वेळेत मिळत नसल्याने मानसिक त्रासाला कंटाळून हर्षलने स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली असे म्हटले जात आहे. हात उसने आणि सावकारांच्या कडून घेतलेले पैसे यांची परतफेड कशी करायची आणि बिल मिळत नसल्याने हर्षलने आत्महत्या केल्याचा आरोप कंत्राटदार असोसिएशनचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी केले आहे. कुरळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील या प्रकरणात अधिक तपास करत आहेत. आत्महत्येचे प्राथमिक कारण समोर आले असले तरी आत्महत्या करण्यामागील खरे कारण शोधण्यासाठी शोध सुरु असल्याचे विक्रम पाटील यांनी सांगितले आहे. या घटनेमुळे तांदूळवाडी गावात शोककळा पसरली आहे. हर्षलच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post