कोल्हापुरात ‘अत्याधुनिक सक्शन आणि जेटिंग मशीन’चे लोकार्पण; पावसाळ्यातील ड्रेनेज अडथळ्यांवर प्रभावी उपाय
कोल्हापूर शहरातील नागरी सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या ताफ्यात अत्याधुनिक सक्शन आणि जेटिंग मशीन समाविष्ट करण्यात आले आहे. या यंत्राचा लोकार्पण सोहळा कोल्हापूरच्या पालकमंत्री मा. प्रकाश आबिटकर, सहपालकमंत्री मा. मधुराताई मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या उपक्रमास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार छत्रपती शाहू महाराज, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मनपा आयुक्त के.मंजूलक्ष्मी, भाजपा आमदार अमल महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, भाजपा आमदार डॉ.राहुल आवाडे, आमदार अशोकराव माने आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. पावसाळ्यात ड्रेनेज लाईन्समध्ये अडथळे निर्माण होऊन नाले तुंबणे, रस्त्यांवर पाणी साचणे अशा समस्या वारंवार समोर येतात. त्या पार्श्वभूमीवर हे यंत्र अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. बंद नाले, साचलेला कचरा, आणि सांडपाणी व्यवस्थापनातील अडचणी दूर करण्यासाठी हे यंत्र महत्त्वाची भूमिका बजावेल. शहराची स्वच्छता, आरोग्य आणि नागरी सुविधा सुरळीत ठेवण्यासाठी महानगरपालिकेने उचललेले हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे. "स्वच्छ, सुसज्ज आणि सुरक्षित कोल्हापूर" या दिशेने प्रशासनाने सुरू केलेल्या उपक्रमांना गती मिळत असल्याचे या लोकार्पणातून स्पष्टपणे दिसून आले.