वडगावला उपजिल्हा रुग्णालयाच्या उभारणीसाठी खासदार माने यांचा ठाम प्रस्ताव

वडगावला उपजिल्हा रुग्णालयाच्या उभारणीसाठी खासदार माने यांचा ठाम प्रस्ताव

वडगाव परिसरातील वाढत्या लोकसंख्येला दर्जेदार आणि सुलभ आरोग्य सेवा मिळाव्यात, यासाठी लोकनेते बळवंतराव यादव हॉस्पिटल हे सुसज्ज उपजिल्हा रुग्णालय म्हणून नव्याने उभारण्याचा ठाम प्रस्ताव खासदार धैर्यशील माने यांनी प्रशासनासमोर मांडला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी ही मागणी जोरदारपणे लावून धरली. या बैठकीला आमदार अशोक माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, इचलकरंजी मनपाचे उपायुक्त नंदू परळकर, डॉ.सरिता थोरात, जानकी भोईटे, मुख्याधिकारी सुमित जाधव, मोहनलाल माळी, रंगराव पाटील, सुकुमार पाटील, शिवप्रभू मदने यांच्यासह विविध पदाधिकारी व कृती समितीचे सदस्य उपस्थित होते. खासदार माने म्हणाले, बळवंतराव यादव हॉस्पिटल हे केवळ जुन्या इमारतीचे नूतनीकरण करून उपयोगी पडणार नाही. नागरिकांच्या गरजा लक्षात घेता नव्या, प्रशस्त जागेत सुसज्ज हॉस्पिटलची उभारणी ही काळाची गरज आहे. त्यांनी इचलकरंजी येथील राज्य कामगार विमा दवाखान्याच्या नूतनीकरणासाठी तातडीने कार्यवाही करण्याचाही आग्रह धरला. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या प्रस्तावास सकारात्मक प्रतिसाद देत सांगितले की, वडगाव येथे १०० खाटांच्या नव्या सुसज्ज उपजिल्हा रुग्णालयासाठी जागा निवडण्याचा प्रस्ताव लवकरच सादर करण्यात येईल. या निर्णयामुळे वडगाव व परिसरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा सहज उपलब्ध होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post