परमेश्वर महान आहे...ईडीच्या तावडीतून सुटले अन् मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली त्यांच्या फेसबुकवर पेजद्वारे पहिली प्रतिक्रिया
मनी लाँड्रिंगप्रकरणी ४० कोटींच्या आरोपातून सुटत मंत्री हसन मुश्रीफ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सक्तवसुली संचालनालय (ईडी) कडून त्यांच्यावर गंभीर आरोप झाले होते. मात्र आता या प्रकरणातून त्यांना क्लीन चिट मिळाल्याने त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. यावर प्रतिक्रिया देताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, "परमेश्वर महान आहे. असं म्हणतात की आंधळ्याच्या गाई परमेश्वर राखी... त्यामुळे माझ्या गायी सुद्धा परमेश्वर राखत असावा. गोरगरिबांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे. वारी सुरू असताना आणि राजर्षी शाहू महाराज जयंतीच्या पूर्वसंध्येला हा दिलासा मिळाल्यामुळे मी परमेश्वराचे आभार मानतो. राजकारणात अनेकदा आरोप-प्रत्यारोपाचे खेळ सुरू असतात, मात्र अखेर सत्याचा विजय होतो, असेही सूचक वक्तव्य त्यांनी यावेळी केले. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या या प्रतिक्रियेनंतर त्यांचे समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे.