लग्न जमत नसल्याने चक्क सख्ख्या भावंडांनी केली आत्महत्या
लग्न जमत नसल्याच्या नैराश्येतून कोणकेरी (ता.हुक्केरी) येथील दोघा सख्ख्या भावंडांनी विषारी औषध प्राशन करुन जीवन संपविले. संतोष रविंद्र गुंडे (वय ५५) व अण्णासाहेब रविंद्र गुंडे (वय ५०) अशी त्यांची नावे आहेत. गुंडे बंधू अर्धे आयुष्य संपले तरी लग्नाची गाठ कांहीं जुळेना या नैराश्येतून दारुच्या आहारी गेले होते. शुक्रवारी दोघांनी दारुच्या नशेत विषारी औषध प्राशन करुन केल्याने ते अत्यवस्थ झाले. त्यांना गडहिंग्लज येथील खासगी इस्पितळात उपचारार्थ दाखल करण्यात आले. जहाल विषारी पदार्थाच्या सेवनाने संतोष आणि अण्णासाहेब याची प्रकृती खालावली. त्याच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. संकेश्वर पोलीस ठाण्यात बाबूराव चंद्रकांत गुंडे यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलीस उपनिरीक्षक एस.डी.जाधव अधिक तपास करीत आहेत.