आमदार हसन मुश्रीफ यांना मंत्रिमंडळात मानाचे स्थान ?
कागलचे नवनिर्वाचित आमदार हसनसो मुश्रीफ यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मानाचे स्थान मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून महायुतीकडून निवडून आलेल्या कोणा कोणाला मंत्रिमंडळात संधी मिळणार याचीही चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणुका नुकताच पार पडल्या, महायुतीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी कागल विधानसभा मतदारसंघातून सहाव्यांदा विजयी होत षटकार मारला, तर जिल्ह्यातून सलग सहा वेळा निवडून येण्याचा विक्रम हसन मुश्रीफ यांनी स्वतःच्या नावावर नोंदवला. पश्चिम महाराष्ट्रातून सलग सहा वेळा निवडून येण्याचा विक्रम इतर कोणत्याही आमदाराला नोंदवता आला नाही. महाराष्ट्राच्या आगामी मंत्रिमंडळात हसनमुश्रीफ यांना मानाचे स्थान दिले जाईल अशी चर्चा आहे. ग्रामविकास मंत्री, महसूल मंत्री, अथवा उपमुख्यमंत्री यासारख्या मोठ्या मंत्रिपदापैकी एक मंत्रीपद हसन मुश्रीफ यांना दिले जाण्याच्या शक्यता राजकीय जाणकारामधून वर्तवली जात आहे. मुश्रीफ यांच्याकडेच कदाचित पालकमंत्री पदाची सूत्रे सोपवली जातील अशी चर्चा जोर धरू लागली आहे. मुश्रीफ ज्येष्ठ, अनुभवी आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम असे आमदार आहेत. विशेष करून अजित पवार यांच्या जवळचे त्यांच्या विश्वासातील आमदार म्हणून त्यांची राजकीय वर्तुळात ओळख आहे. त्यामुळेच तर अजितदादांनी महाराष्ट्रात पहिल्यांदा कागल मध्ये येऊन महायुतीचा पहिला उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची घोषणा केली होती. त्यांनी त्यांच्याकडे जी जी मंत्रीपदे सोपवली त्या पदाचा वापर करून सर्वसामान्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. मागील मंत्रिमंडळात त्यांना वैद्यकीय व विशेष कार्य पद देण्यात आले, व त्या अगोदरच्या मंत्री मंडळात कामगार मंत्री पद देण्यात आले होते. या मंत्रीपदावरही त्यांनी भरीव काम करून दाखवले आहे. बांधकाम कामगारांना शासकीय योजनेच्या माध्यमातून हक्काचा निधी तसेच इतर योजनांच्या सवलती मिळवून देण्यात मुश्रीफ यांनी चांगलीच कामगिरी बजावली आहे. अद्याप मंत्रिमंडळ स्थापन झालेले नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कोण याचा घोळ कायम आहे. तरीही मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात हसन मुश्रीफ यांचे नाव निश्चित असेल, त्यांना ग्रामविकास, कामगार किंवा अल्पसंख्याकांचा आश्वासक चेहरा म्हणून उपमुख्यमंत्री पदासारखे मोठे पद मिळेल असा विश्वास राजकीय जाणकारांचा आहे. जिल्ह्यात आणखीन कोणाकोणाला मंत्रिमंडळात स्थान दिले जाईल, याची अस्पष्टता आहे. शिरोळचे अपक्ष आमदार डॉ.राजेंद्र पाटील शिवसेनेचे जिल्ह्यातील आमदार प्रकाश आंबीटकर, राजेश क्षीरसागर भाजपाचे अमल महाडिक यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी चर्चा जिल्ह्यात होऊ लागली आहे. अजित दादा दरवेळी धक्का तंत्राचा वापर करण्यात पटाईत असल्यामुळे चर्चेत नसलेलं उपमुख्यमंत्री पद शाहूंच्या पुरोगामी कागलात एक अल्पसंख्यांक चेहरा म्हणून आमदार हसन मुश्रीफ यांना संधी देऊन, आणखीन एक धक्का महाराष्ट्राला दिला तर आश्चर्य वाटायला नको. कदाचित मुश्रीफ साहेबांना ही लॉटरी लागू शकते. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या कोर कमिटी मध्ये सुद्धा चर्चा केली असल्याचे समजते.
वसुंधरा शक्ती न्यूजसाठी कापशी प्रतिनिधी :- यशवंत पाटील