केडीसीसी बँक करणार प्रधानमंत्री सूर्यघर वीज योजनेसाठी कर्ज पुरवठा

केडीसीसी बँक करणार प्रधानमंत्री सूर्यघर वीज योजनेसाठी कर्ज पुरवठा 


कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने विकास सेवा संस्थांच्या माध्यमातून शेतकरी सभासदांना आणि व्यक्तीगत कर्ज योजनेतून पगारदार नोकरदार व व्यावसायिकांना प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी कर्जपुरवठा करण्यात येणार आहे. पालकमंत्री व बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महिनाभरापूर्वी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शेतकरी सभासद,पगारदार नोकरदार वव्यावसायिकांसाठी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेसाठी कर्जसुविधा सुरू करावी, अशी मागणी सभासदांनी केली होती. त्यानुसार बँकेने १२ टक्के व्याजदराने या योजना अंमलात आणल्या आहेत. केंद्र सरकारने देशातील नागरिकांना मोफत वीज पुरवठा करण्याकरीता प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना अंमलात आणली आहे. या योजनेअंतर्गत ३०० युनिट मोफत वीज मिळणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी सभासदांना, नोकरदार पगारदारांना व व्यावसायिकांना प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेचा लाभ मिळण्याकरीता विकास सेवा संस्थांच्या माध्यमातून व वैयक्तिक असा कर्ज पुरवठा केला जाणार आहे. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष आमदार राजूबाबा आवळे, सर्व संचालक, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरख शिंदे आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post