सुट्टीवर आलेल्या जवानालां त्याच्या पत्नी व साथीदाराने हात-पाय व डोळे बांधून विष पाजण्याचा केला प्रयत्न ; गडहिंग्लज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
देश सुरक्षित रहावा यासाठी आपले जवान जीवाची पर्वा न करता सेवा बजावित असतात. गडहिंग्लज तालुक्यातील नुलं येथील जवान अमर हे सुट्टीवर गावी आल्यानंतर त्यांच्या पत्नीने आपल्या सहकारीच्या मदतीने जवान पतीचे हात पाय व डोळे बांधून नाक व तोंडा वाटे त्याला विषपाजून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल गडहिंग्लज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. सदर घटना कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील नुलं येथे घडली असून अमर भीमगोंडा देसाई वय वर्षे 39 असे सदर जवानाचे नाव आहे. त्याला पुढील उपचारासाठी कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. घटना स्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की जवान अमर हे मूळचे नुलं तालुका गडहिंग्लज येथील रहिवाशी असून अमर हे पत्नीसह गडहिंग्लजला शंकेश्वर रोडवरील पाटणे पाईप कारखान्याजवळ भाडोत्री घरात राहतात. अमर ड्युटीवर गेल्यावर पत्नी एकटीच घरी राहते दरम्यान काही दिवसापूर्वीच अमर सुट्टीवर गावी आले असताना गुरुवार दिनांक 18 जुलै रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास राहत्या घरातच पत्नी व तिच्या अज्ञात साथीदाराने अमरचे हात-पाय व डोळे बांधून त्यांच्या नाका व तोंडावाटे कोणतेतरी विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न करीत होते. दरम्यान अमर यांनी जोरात आरडा-ओरड केल्याने शेजारचे नागरिक त्याच्या घरी आले असता दरवाजा तोडून नागरिकांनी आत प्रवेश केल्यानंतर अज्ञात साथीदाराने आत आलेल्या खाडे नावाच्या नागरिकाच्या डोक्यात एका वजनदार वस्तूने मारून तिथून दोघांनीही पळ काढला त्यानंतर नागरिकांनी जखमी खाडे व जवान अमर यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले तिथे प्राथमिक उपचारानंतर अमर यांना कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असुन जवान यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. अमर यांच्या फिर्यादीवरून गडहिंग्लज पोलीस स्टेशनमध्ये पत्नी व अज्ञात साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
वसुंधरा शक्ती न्यूजसाठी बोरगांवहुन अजित कांबळे