एकसंबा येथील माजी ग्रामपंचायत अध्यक्षांच्या पतीचा खून ; खुनाचे कारण अस्पष्ट
एक्सांभा येथील माजी ग्रामपंचायत अध्यक्षांच्या पतीचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना सोमवारी 17 रोजी सकाळी बिरेश्वर नगरात उघडकीस आली. महांतेश श्रीमंत कुरणी (वय 48) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सदलगा पोलिस ठाण्यातर्फे पंचनामा करण्यात आला असून सदर प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.घटना स्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, सोमवारी सकाळी बिरेश्वरनगर येथे राहणाऱ्या व्यक्तींना एका व्यक्तीचा मृतदेह पडल्याचे आढळून आले. सदर माहिती गावातील पुढाऱ्यांमार्फत सदलगा पोलिसांना कळविण्यात आली. सकाळी घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन स्थानिकांची विच्यारापूस केली. दरम्यान रविवारी रात्री यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रम पाहून रात्री 2 च्या सुमारास अनेकजण घरी परतले त्यावेळी त्या ठिकाणी काहीच नव्हते असे स्थानिकांनी सांगितले. यामुळे सदर घटना पहाटे घडली असावी असा अंदाज व्यक्त होत आहे.सदलग्याचे उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार, सीपीआय, एसपी व सहाय्यक पोलिस निरीक्षकांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. यावेळी त्यांच्या नातेवाईकांशी या घटनेबाबत विचारपूस करण्यात आली. सदर बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी सदर भाग सिल केला होता. दुपारी सारी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांकडे देण्यात आला. तांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. सदलगा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार यांच्या कडून अधिक तपास केला जात आहे.
वसुंधरा शक्ती न्यूजसाठी बोरगांवहुन अजित कांबळे.