पतित पावन विद्यामंदिर ओझर्डे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
ओझर्डे येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित पतित पावन विद्यामंदिर, ओझर्डे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. इयत्ता पाचवी ते दहावी सुमारे दोनशे विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यामध्ये सहभागी झाले. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे शासन आदेशानुसार महत्त्व कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापिका सौ. वंदना यादव मॅडम यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडले. सहजयोग ध्यान केंद्र वाई येथील योगशिक्षक श्री संतोष सावंत व श्री संदेश पिसाळ हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांचा मुख्याध्यापिका प्रा सौ. वंदना यादव यांच्या हस्ते शाल श्रीफळ, पुष्प व शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांचे जीवन व कार्य हे पुस्तक भेट देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. विद्यालयाच्या वतीने निमंत्रण दिल्यानंतर त्यांनी खास ओझर्डे येथील विद्यार्थ्यांसाठी सुमारे दीड तास विविध योग साधनेचे धडे व माहिती त्यांनी दिली. यामध्ये त्यांनी आत्मसाक्षरता घ्या व मनःशांती मिळवा हा प्रमुख विषय घेऊन मार्गदर्शन केले. तसेच वाई तालुक्यातील पतित पावन विद्यामंदिर ओझर्डे ही शाळा इतर विद्यालयांपेक्षा विविध उपक्रमांमध्ये व सर्व स्तरावर अग्रेसर असल्याचे सांगून विद्यालयाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ प्रतिभा बेलोशे यांनी केले. यावेळी जेष्ठ शिक्षक एम.ए. मुकादम तसेच क्रीडा विभागाचे श्री दीपक महापुरे व डॉ. सुनील फरांदे यांनी विद्यार्थ्यांना योगा बद्दल प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखवून योगा संदर्भात माहिती दिली. कार्यक्रमात सहशिक्षक श्री समीर आतार, रेश्मा आतार, नेत्रा सोनवणे व सागर पुजारी यांनी सहभाग घेतला. सहज योग ध्यान केंद्र वाई येथील मार्गदर्शक योगशिक्षकांचे व उपस्थितांचे आभार श्री सचिन माने यांनी मानले.