श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलमध्ये 'माजी विद्यार्थिनी स्नेहमेळावा' संपन्न
हीरक महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणा-या इचलकरंजी शहरातील श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनि. कॉलेज या पहिल्या मुलींच्या शाळेच्या माजी विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा आज प्रशालेच्या प्रांगणात सपन्न झाला. 1968 च्या पहिल्या वर्षापासूनच्या अनेक माजी विद्यार्थिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमात प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. त्यानंतर सौ.ए.ए.रानडे व संगीत मंचच्या विद्यार्थिनींनी शालेय परिपाठ सादर केला. प्रा.युवराज मोहिते यांनी संस्थेच्या व शाळेच्या वाटचलीचा थोडक्यात आढावा घेतला. या वेळी झालेल्या कार्यक्रमात प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती.एस.एस.गोंदकर यांनी सर्वांचे प्रशालेत स्वागत केले. आपल्या प्रास्ताविकात त्या म्हणाल्या, 'आपल्या सर्वांचा आजचा दिवस शाळेचा असूनही अभ्यास नाही, परीक्षा नाही, शिक्षा नाही, शिस्त नाही केवळ ऋणानुबंध आणि बांधिलकी जपणे आहे.'यानिमित्त विविध क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या माजी विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.श्री एकनाथ आंबोकर म्हणाले, ' पुढील जीवनात आपण कितीही प्रगती केली तरी शालेय जीवनात व त्या आठवणीत रमायला सर्वांना आवडते. शाळेच्या संस्कारांची शिदोरी आपल्याला जन्मभर पुरते. मैत्रीचा अमूल्य ठेवा आपल्याला शाळेतच मिळतो. तो आपण आयुष्यभर जपूया.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.ना.बा.एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री.कृष्णाजी बोहरा हे होते. आपल्या अध्यक्षीय मनोगतात ते म्हणाले, 'श्रीमंत घोरपडे सरकारांनी लावलेल्या या शैक्षणिक रोपट्याचे स्व.मदनलालजी बोहराशेठजी यांनी वटवृक्षात रुपांतर केले. सर्व माजी विद्यार्थिनींनी या शाळेशी असलेले आपले ऋणानुबंध आयुष्यभर जपावे. याप्रसंगी संस्थेचे व्हा.चेअरमन श्री.उदय लोखंडे, महिला सक्षमीकरण अधिकारी सौ. गंधाली थोरवत, प्रा. शेखर शहा यांनी मनोगत व्यक्त केले. सवंगडी ग्रुपने प्रशालेतील गरीब मुलींसाठी सायकली भेट दिल्या. या कार्यक्रमास स्कूल कमिटी चेअरमन श्री.मारुतराव निमणकर, संस्थेचे विश्वस्त श्री.अहमद मुजावर, श्री.महेश बांदवलकर, उपमुख्याध्यापिका सौ.एस.एस.भस्मे,पर्यवेक्षक श्री.व्ही.एन.कांबळे तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. दुपारच्या सत्रात स्नेहभोजन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा लाभ सवर्वांनी घेतला. सर्व उपस्थित माजी विद्यार्थिनींना प्रशालेच्या वतीने स्मृतिचिन्ह भेट देण्यात आले. दिवसभर चाललेल्या या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने सर्व माजी विद्यार्थिनी आपल्या काळाच्या शाळेतील वातावरण जागवत अनेक आठवणीमध्ये रंगून गेल्या. पर्यवेक्षक श्री.एस.व्ही.पाटील यांनी आभार प्रदर्शन केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.एस.एम.कवळेकर यांनी केले.