इचलकरंजीत विजेच्या धक्क्याने एका युवकाचा मृत्यू ; शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद
शाहु पुतळा परिसरात असलेल्या टीव्हीएस शोरुममध्ये शुक्रवारी सकाळी काम करत असताना शॉक लागून कामगाराचा मृत्यू झाला. रविकुमार बनारसीलाल केसरवाणी वय ३३, रा. गोकुळ चौक असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि, रविकुमार केसरवाणी याचे कुटुंबिय हे गोकुळ चौकात राहण्यास आहे. मात्र रविकुमार हा शाहु पुतळ्याजवळील टीव्हीएस शोरुममध्ये काम करत त्याचठिकाणी वास्तव्यास होता. शुक्रवारी सकाळी ९ वाजता नेहमीप्रमाणे त्याने शोरुम उघडून कामाला सुरुवात केली. काम करत असतानाच त्याला अचानकपणे वीजेचा धक्का बसला आणि तो जमीनीवर कोसळला. तो पडल्याचे पाहून तेथे असलेल्या अन्य कर्मचाऱ्यांनी रविकुमार याला तातडीने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबतची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीसांनी रुग्णालय आणि घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. रुग्णालय आणि घटनास्थळ या दोन्ही ठिकाणी रविकुमार याच्या नातेवाईक आणि नागरिकांनीही गर्दी केली होती. केसरवाणी हा अविवाहीत असून त्याच्या आई, पश्चात २ भाऊ आणि १ बहिण असा परिवार आहे.