विशेष पोलीस महानिरीक्षकांकडून कोल्हापूर पोलीस दलाचे कौतुक
कोल्हापूर परीक्षेत पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी बुधवारी कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाची वार्षिक तपासणी केली. यावेळी पोलीस परेड ग्राउंडवर दिमाखात वार्षिक पथ संचलन झाले. संचलनात स्क्वाड ड्रिल, शस्त्र कवायत, आर.टी.पथकाचे टॅक्टीकल श्वान पथकाचे कवायत अशा विविध कवायतीने लक्ष वेधले गेले. बुधवारी दिवसभर विशेष पोलीस निरीक्षक सुनील फुलारी यांच्या उपस्थितीत वार्षिक तपासणी करण्यात आली. या तपासणीसह वर्षभरातील आढावा घेण्यात आला.
यावेळी फुलारी यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. सकाळी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी संचलनाचे नेतृत्व करत मानवंदना दिली. यावेळी विविध प्रकारच्या चित्त थरारक कवायती सादर केल्या. सुनील फुलारे यांनी यावेळी दंगा काबू योजना प्रभावीपणे व यशस्वीरित्या कशा प्रकारे राबवावी याबाबत मार्गदर्शन केले. संचलनानंतर विशेष पोलीस निरीक्षक फुलारी यांनी पोलीस पाटील यांची बैठक घेतली. बैठकीला ७० पोलीस पाटील उपस्थित होते. जिल्ह्यात पोलीस पाटील यांची २७४ पदे रिक्त आहेत ही पदे भरावीत, थकित मानधन व प्रवास भत्ता मिळावा अशा मागण्या उपस्थित पोलीस पाटील यांनी केल्या. यावेळी फुलारी यांनी आचारसंहिता संपल्यानंतर शासनाकडे या मागण्यांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. गिरवली गावाचे पोलीस पाटील मोहन कदम यांचा विशेष पोलीस निरीक्षक फुलारी यांनी विशेष सत्कार केला.