येथील पोलिस ठाण्याचे पोलिस काॅन्स्टेबल सद्दाम शेख पोलिस ठाण्याकडे ड्युटीवर येत असताना अज्ञात वाहनाने धडकल्याने गंभीर जखमी झाले आहेत. शिरढोण कुरुंदवाड रस्त्यावर हाॅटेल मेजवानी येथे बुधवारी रात्री दहाच्या सुमारास हा अपघात घडला. शेख यांना उपचारासाठी इंचलकरंजी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शेख येथील पोलिस ठाण्यात काॅन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. ते रुकडी (ता. हातकणंगले) येथे राहतात. बुधवारी नाईट ड्युटी असल्याने वर्दी परीधान करुन आपल्या दुचाकीवरून कुरुंदवाकडे जात होते. शिरढोण कुरुंदवाड दरम्यान हाॅटेल मेजवानी जवळ येताच कुरुंदवाडहून इंचलकरंजीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने शेख यांच्या दुचाकीला जोराची धडक देवून वाहनचालक न थांबताच निघून गेला. शेख यांच्या डोके, हात आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून मोटारसायकलीचा चक्काचूर झाला आहे. कुरुंदवाड पोलिसांनी या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजवरुन वाहनांचा रात्री उशिरापर्यंत शोध घेत होते.