इचलकरंजी व परिसरात पवित्र रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी
इचलकरंजी व परिसरातील मुस्लिम बांधवांनी गुरुवारी पवित्र रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी केली. स्टेशन रोडवरील ईदगाह मैदान येथे सकाळी सामुहिक नमाज पठण करण्यासाठी मोठ्या संख्येने समाज बांधव जमले होते. यावेळी जागतिक शांततेसह देशातील एकता व अखंडता कायम राहून सर्व संकटे दूर होण्यासाठी दुवापठण करण्यात आले. नमाजनंतर सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी व माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर यांनी मुस्लिम बांधवाना शुभेच्छा दिल्या. तर प्रशासनाच्या वतीने पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, अप्पर पोलीस अधिक्षक निकेश खाटमोडे, पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे राजीव पाटील यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मदन कारंडे, राहुल खंजिरे, संजय कांबळे, सयाजी चव्हाण, कैश बागवान, महादेव गौड, सदा मलाबादे, सावकार मादनाईक, सागर शंभूशेटे, विकास चौगुले, बसगोंडा बिरादार उपस्थित होते. मुस्लिम समाजात रमजान ईद सर्वात मोठा सण मानला जातो. यादिवशी ईदगाह मैदान येथे सामुहिक नमाज पठण केले जाते. मोठ्या संख्येने ईदगाह मैदान येथे मुस्लिम बांधव नमाज पठण करण्यासाठी जमले होते. उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेता यंदा नमाज पठणाची वेळ लवकर करण्यात आली होती. फातिमा मस्जिदचे इमाम इम्तियाज अब्दुलजीज बाणदार यांनी बयान पठण तर नमाज पठण अक्सा मस्जिदचे कारी इरफान जमीर कुरेशी यांनी केले. हजरत सय्यद मखतूमवली दर्गा ट्रस्ट व इदगाह ट्रस्ट यांचेवतीने नियोजन करण्यात आले होते. बादशाह बागवान व अहमद मुजावर यांनी आभार मानले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेतली होती.