कुंभोज प्रतिनिधी( विनोद शिंगे)
बाहुबली - श्री अतिशय क्षेत्र बाहुबली येथे पीतवर्णी भगवान बाहुबली महामूर्तीचे अमृतमहोत्सवी वर्ष भगवान बाहुबली बृहन्मूर्ती व श्री बाहुबली विद्यापीठ यांची 61 वर्षपूर्ती या निमित्ताने बाहुबली तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी दोन दिवसीय विश्वशांती विधानाचे आयोजन 24 फेब्रुवारी 2024 ते 25 फेब्रुवारी 2024 रोजी करण्यात आले आहे. या धार्मिक विधाना बरोबरच शैक्षणिक नैतिक व सांस्कृतिक उपक्रमांचा धर्मलाभ समाजातील सर्व घटकांनी घ्यावा, असे आवाहन बाहुबली विद्यापीठाचे महामंत्री डी.सी.पाटील यांनी केले. यावेळी श्री बाहुबली विद्यापीठाचे अध्यक्ष आमदार श्री.प्रकाशअण्णा आवाडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना श्री.डी.सी.पाटील म्हणाले की, आधुनिक गुरुकुल शिक्षण प्रणालीचे थोर प्रणेते परमपूज्य गुरुदेव 108 श्री समंतभद्र महाराज यांनी स्थापन केलेल्या श्री बाहुबली ब्रह्मचर्याश्रम व बाहुबली विद्यापीठ या उभय संस्थांमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. येथे शिक्षण घेऊन समाजामध्ये विविध पदांवर राहून समाजकार्य करीत आहेत. अशी उज्वल परंपरा असलेल्या संस्थेच्या दृष्टीने हा अनोखा मिलाप असलेला सोहळा संपन्न होत आहे. 24 फेब्रुवारी रोजी श्रुतस्कंध विधान तसेच समंतभद्र महाराज यांचे छायाचित्र प्रदर्शनी, बाहुबलीचे आधारवड या विषयावरील चर्चासत्र, संस्थेचे माजी अध्यक्ष माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे दादा यांनी संस्थेला दिलेल्या सेवायोगाबद्दल कृतज्ञता समारंभ, गुरुदेव समंतभद्र महाराज यांच्या जीवनावरील महानाट्य संपन्न होणार आहे. तसेच 25 फेब्रुवारी रोजी 64 ऋद्धी विधान, गुरुकुल ते गुगल - नैतिक व राष्ट्रीय चारित्र्य या विषयावर कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजीत देशमुख व शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के यांचे व्याख्यान असणार आहे. तसेच प्रथमाचार्य शांतीसागरजी महाराज यांच्यावरील चित्रपट दाखवले जाणार आहे. या विधानाकरिता आचार्यश्री चंद्रप्रभसागरजी महाराज व ससंघ यांचे मंगल सानिध्य व नांदणीचे प.पू.स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक महास्वामीजी व कोल्हापूरचे प.पू.स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक महास्वामीजी यांची मंगल उपस्थिती लाभत आहे. या पत्रकार परिषदेसाठी संस्थेचे कोषाध्यक्ष बाबासाहेब पाटील, संचालक गोमटेश बेडगे, बाळासाहेब चोपडे, श्रीधर हेरवाडे, कमलाकर चौगुले, बलराम महाजन, तात्यासो अथणे, महावीर पाटील, अशोक पाटील, राजू खोत, सुधाकर मणेरे, जिनरत्न रोटे, आनंदभाई शहा, जीवंधर अलगुर, दीपक शहा, सीईओ सुकुमार बेळंके, ऋषभनाथ मलिकवाडे व सर्व ट्रस्टी, दीपक वाडकर, नेमिनाथ बाळीकाई, विनोद मगदूम व पत्रकार उपस्थित होते.