दिल्लीत ९ वर्षाच्या चिमुकलीवर नराधमाने केला बलात्कार, सुटकेसमध्ये आढळली रक्तबंबाळ अवस्थेत मुलगी
भारतात बलात्काराच्या घटना प्रचंड प्रमाणात वाढत आहे. अशीच संतापजनक घटना दिल्लीत घडली आहे. नऊ वर्षाच्या मुलीवर नराधमाने बलात्कार केला आहे. ती बर्फ घेऊन आपल्या आजीच्या घराकडे गेली होती. पण, बराच वेळ उलटला तरी लेक घरी आलीच नाही. मग शोधाशोध सुरू झाली. त्यावेळी कळलं की ती घरातून निघाली, पण आजीच्या घरी पोहोचलीच नाही. मग कळलं की, काही लहान मुलांनी तिला एका फ्लॅटमध्ये जाताना बघितलं. त्यानंतर जे समोर आलं, ते धक्कादायक होतं. मुलगी एका सुटकेसमध्ये अर्धनग्न अवस्थेत आणि बेशुद्ध पडलेली होती. ही घटना घडली ती दिल्लीतील नेहरू विहार भागात. शनिवारी रात्री नऊ वर्षाची मुलगी एका फ्लॅटमधील सुटकेसमध्ये बेशुद्धावस्थेत आढळून आली. तिच्यावर बलात्कार करून हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तिच्या आई वडिलांनी केला. पोलिसांनी सांगितलं की, मुलीचे वडील तिला रुग्णालयात घेऊन चालले होते. त्यावेळी ती बेशुद्धावस्थेत होती. पण, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिने प्राण सोडला. रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. पीडित मुलीच्या आईवडिलांनी कॉलनीमध्ये राहणाऱ्या नौशाद नावाच्या व्यक्तीने बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. संशयित आरोपी घटना घडल्यापासून फरार आहे.