बेडकीहाळ येथे शौर्य श्री धर्मस्थळ आपत्ती निवारण पथकाची पूर जनजागृती ; गावकऱ्यांनी व्यक्त केला कृतज्ञतेचा भाव
बेडकीहाळ दूधगंगा नदी परिसरात पूरस्थितीची शक्यता लक्षात घेता शौर्य श्री धर्मस्थळ आपत्ती निवारण पथक, बेडकीहाळ यांच्यावतीने पूर्व जनजागृती कार्यक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत संगाने, निंबाळकर, सुभेदार, जाधव व मोहिते मळ्यातील रहिवाशांना प्रत्यक्ष भेटून पूर येण्यापूर्वी कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. याप्रसंगी गेल्या वर्षी शौर्य पथकाच्या माध्यमातून पुरामध्ये करण्यात आलेल्या मदतकार्याची आठवण करून देत संगाने मळ्यातील श्री शंकर भाऊ संगाने व श्री बाळासाहेब चंद्रकांत संगाने यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी संघटनेच्या निरपेक्ष व सेवाभावी कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत उपस्थित स्वयंसेवकांचे कौतुक केले. या कार्यक्रमाला सर्व मळ्यातील रहिवासी आणि शौर्य संघटनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पूर आपत्तीच्या काळात ग्रामस्थांनी सुरक्षिततेच्या उपाययोजना अमलात आणाव्यात, असा संदेशही यावेळी देण्यात आला.