राज्यातील कारागृहांमध्ये ५०० कोटींचा घोटाळा ; राजू शेट्टींचा गंभीर आरोप

राज्यातील कारागृहांमध्ये ५०० कोटींचा घोटाळा ; राजू शेट्टींचा गंभीर आरोप

राज्यातील कारागृहांमध्ये ५०० कोटी रुपयांचा मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप शेतकरी नेते आणि स्वाभिमानी पक्षाचे प्रमुख राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत केला. जळगावमधील ‘साई मार्केटिंग’ कंपनी आणि तिचे संचालक सुनील झवर यांचाही या प्रकरणात सहभाग असल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथराव खडसे यांनीही या आरोपांना दुजोरा दिला आहे. राजू शेट्टी यांनी सांगितले की, राज्यातील जिल्हा कारागृहांमध्ये कैद्यांसाठी जेवण व अन्य आवश्यक वस्तूंच्या खरेदी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. बाजारभाव आणि खरेदी दाखवलेल्या किंमतींमध्ये मोठा फरक असून त्यातून सुमारे ५०० कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप त्यांनी केला. या घोटाळ्यात जळगावमधील मंत्री गिरीश महाजन यांच्याशी निकटचे संबंध असलेल्या साई मार्केटिंगचे संचालक सुनील झवर यांचा समावेश असल्याचे शेट्टी यांनी नमूद केले. त्यामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. शेट्टी म्हणाले, कैद्यांच्या भोजनातही भ्रष्टाचार सुरू असून, जे अन्न दिलं जातं ते जनावरांनाही खाऊ नये असं आहे. याचबरोबर रेशन, कॅन्टीन आणि विद्युत उपकरणांच्या खरेदीमध्येही आर्थिक अपहार झाल्याचे त्यांनी नमूद केले. एकनाथराव खडसे यांनी शेट्टी यांच्या आरोपांना दुजोरा देत सांगितले की, हा घोटाळा जळगाव जिल्ह्यातील एका मंत्र्यांच्या जवळच्या ठेकेदाराशी संबंधित आहे. कैद्यांना दिलं जाणारं अन्न अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे. राजू शेट्टी यांनी लवकरच या प्रकरणाचे पुरावे पावसाळी अधिवेशनात सादर करण्याचा इशारा दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post