आमदार डॉ.राहुल आवाडे यांच्या प्रयत्नांना यश ; वस्त्रउद्योजकांच्या बांधकाम परवान्याच्या प्रश्नावर ऐतिहासिक निर्णय
इचलकरंजीसह राज्यभरातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम वस्त्रउद्योग क्षेत्रासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या १० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या “सामुहिक प्रोत्साहन योजना २०१३” अंतर्गत ग्रामपंचायतीकडून देण्यात आलेल्या बांधकाम परवान्याच्या मान्यतेचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. या जटिल आणि दीर्घकाळ प्रलंबित प्रश्नावर आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी सातत्याने व ठामपणे पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांची सकारात्मक साथ लाभली आणि या संयुक्त प्रयत्नांतून राज्य शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाकडून अधिकृत अध्यादेश जारी करण्यात आला आहे. या निर्णयानुसार, १४ मे २०१५ पूर्वी ग्रामपंचायतीने दिलेले बांधकाम परवाने वैध आणि ग्राह्य धरले जाणार आहेत. यामुळे अनेक वस्त्रउद्योजकांना औद्योगिक मान्यता मिळवण्यात मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच, सामुहिक प्रोत्साहन योजना २०१३ अंतर्गत पात्रता प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या उद्योजकांना आता वस्त्रोद्योग विभागाकडून ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) मिळवून ५ टक्के व्याज अनुदानाचा लाभ मिळणार आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे इचलकरंजी, जयसिंगपूर, शिरोळ, हातकणंगले या औद्योगिक पट्ट्यातील हजारो वस्त्रउद्योगांना चालना मिळेल, नव्या गुंतवणुकीला मार्ग मोकळा होईल आणि रोजगारनिर्मितीला गती मिळणार आहे. उद्योजकांमध्ये समाधानाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आमदार डॉ.राहुल आवाडे यांच्या नेतृत्वाची पुन्हा एकदा ठळक जाणीव झाल्याचे उद्योगजगतातून सांगण्यात येत आहे.