हातकणंगले विधानसभा मतदारसंघात होणार तिरंगी लढत

हातकणंगले विधानसभा मतदारसंघात होणार तिरंगी लढत 


२७८  हातकणंगले राखीव विधानसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी २५ उमेदवारांपैकी ९ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज माघार घेतली. तर १६ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. मात्र यापैकी आम.राजु आवळे (कॉग्रेस), मा.आम.डॉ.सुजित मिणचेकर (शेतकरी संघटना) आणि महायुतीचे उमेदवार अशोकराव माने या उमेदवारांमध्येच तिरंगी लढत रंगणार आहे. आरक्षित मतदार संघ असला तरीही जातीय समीकरणे या निवडणूकीत महत्वाची ठरण्याची शक्यता अधिक आहे. विधानसभा निवडणूकीत हातकणंगले मतदारसंघातून महायुती, महाविकास आघाडी आणि परिवर्तन महाशक्ती आघाडी रिंगणात आहेत . यापैकी  आमदार राजू आवळे यांनी गेल्या पाच वर्षात केलेली विकासकामे आणि जनसंपर्काची शिदोरी घेऊन रिंगणात उतरले आहेत. कॉग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांची त्यांना सोबत असणार आहे. महायुतीतून जनसुराज्यचे उमेदवार दलित मित्र अशोकराव माने रिंगणात उतरले आहेत. २०१९ च्या पराभवानंतरही माने यांनी गेल्या पाच वर्षात मतदार संघातील संपर्क सोडलेला नाही. प्रत्येक कार्यक्रम, सभि समारंभातही त्यांनी हजेरी लावली आहे. या संपर्काच्या जोरावर ते निवडणूक रिंगणात उतरले आहेत. भाजपा, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार) आणि  जनसुराज्यची ताकद त्यांच्या सोबत असणार आहेत. अखेर पर्यंत उमेदवारीसाठी प्रयत्नशील राहीलेले माजी आमदार डॉ.सुजित मिणचेकर यांना सरते शेवटी शेतकरी संघटनेची साथ मिळाली. शेवट पर्यंत ते उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाकडे प्रयत्न करीत राहीले. मात्र तेथे त्यांना नाराजी पत्करावी लागली. शेवटी मा.खा.राजू शेट्टीची शेतकरी संघटना, बच्चू कडूंची प्रहार संघटना आणि संभाजी महाराजांची स्वराज्य संघटना यातून उभी राहीलेली परिवर्तन महाशक्ती आघाडीच्या माध्यमांतून त्यांना साथ दिली. यातून ते यंदा निवडणूकीला सामोरे जात आहेत. कॉग्रेसचे आमदार सतेज पाटील, मा.आमदार राजीव आवळे, उभाठाचे जिल्हाध्यक्ष संजय चौगुले, खासदार धैर्यशील माने, माजी आमदार सुरेश हाळवणकर, महादेवराव महाडीक, अमल महाडीक, आमदार प्रकाश आवाडे, आमदार विनय कोरे तसेच मा.खासदार राजू शेट्टी आदींची प्रतिष्ठा या निवडणूकीत पणाला लागणार आहे. राखीव मतदार संघ असला तरीही बौद्ध, मातंग, चर्मकार, जैन, लिंगायत, मुस्लीम आणि मराठा अशा सर्वच समाजांची समीकरणे या निवडणूकीत महत्वाची ठरणार आहेत.

विनोद शिंगे कुंभोज

Post a Comment

Previous Post Next Post