महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांना विक्रमी मताधिक्य द्यावे ; भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर
लिंबू चौक हा परिसरात दाट लोकवस्तीचा आणि कष्टकरी कामगारांचे वास्तव्य असलेला भाग आहे. या भागात आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. मात्र सर्वांगिण विकास होण्यासाठी आपल्या माणसाची गरज असते. त्यासाठी महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांना सर्वांचे आपले बहुमूल्य मत देऊन त्यांना विक्रमी मताधिक्य द्यावे, असे आवाहन भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी केले. या भागासह शहरवासियांना भेडसावणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आम्हीच सोडवणार असून सुळकूड योजनाही लवकरच मार्गी लागेल, असा विश्वासही त्यांनी दिला. 279- इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार राहुल प्रकाश आवाडे यांच्या प्रचारार्थ लिंबू चौकातील गुरुकन्नननगर मठ येथे प्रभाग क्रमांक 28 व 29 मधील कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला. त्याप्रसंगी श्री. हाळवणकर मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी भागातील नागरिकांनी राहुल आवाडे यांना विक्रमी मताधिक्यांनी विजयी करु असा निर्धार व्यक्त केला. निपाणीच्या आमदार सौ.शशिकला जोल्ले यांनी, महायुतीचे सरकार सत्तेत आल्यापासून सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानत विविध योजना आणल्या. केवळ घोषणा केल्या नाहीत तर त्या त्या योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहचविला. महिलांना लाडकी बहिण योजनेतून स्वावलंबी बनविले. एस.टी.मध्ये पन्नास टक्के सवलत देत त्यांना प्रवासाची सुविधा देतानाच तोट्यातील महामंडळ फायद्यात आणले. अजुनही महिलांसह सर्वसामान्यांसाठी विविध योजना आहेत, त्यासाठी महायुतीचे सरकार येण्यासाठी राहुल आवाडे यांना विधानसभेत आपला प्रतिनिधी म्हणून पाठवूया, असे आवाहन केले.याप्रसंगी अथणीच्या नगराध्यक्षा सौ.गीता कोरी, वृषभ जैन, संतोष शेळके, उमाकांत दाभोळे, नागेश पाटील, तात्यासो कुंभोजे, योगिता दाभोळे, संगीता घोरपडे, अलका विभुते, अमिता बिरंजे, छाया तोडकर, राजू पुजारी, बाबु डिग्रजकर, सुशांत बेडक्याळे, सचिन जाधव आदींसह भागातील नागरिक, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.