विसर्जन मिरवणुकीत लेसर लाईट्सना बंदी ; वापर करणाऱ्या मंडळांवर कारवाईचे आदेश

विसर्जन मिरवणुकीत लेसर लाईट्सना बंदी ; वापर करणाऱ्या मंडळांवर कारवाईचे आदेश 


मिरवणुकामध्ये मोठा प्रमाणात वापरण्यात येणाऱ्या लेसर लाईट्समुळे डोळ्यांना इजा होत आल्याने ते धोकादायक ठरत आहेत. याचा धोका लक्षात घेऊन कोल्हापूर अपर जिल्हा दंडाधिकारी संजय तेली यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत लेसर लाईट्सना बंदी घातली. गुरुवारी दुपारी बंदी आदेश जारी केला असून, पोलिसांना कारवाई संदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे विसर्जन मिरवणुकीत लेसर लाईट्सचा वापर करणाऱ्या मंडळांवर कारवाई होणार आहे. गणेश आगमन मिरवणुकांमध्ये सार्वजनिक मंडळांनी लेसर लाईट्सचा झगमगाट केला. मात्र, अतितीव्रतेच्या लाईट्समुळे उचगाव येथील एका युवकाच्या डोळ्याला इजा झाली. मिरवणूक पाहण्यासाठी गेलेल्या अनेकांना लेसर लाईट्सचा त्रास झाला. याबाबत नियंत्रण कक्षाकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. डोळ्यांवर उपचार करणारे ऑप्थल्मोलॉजिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. चेतन खारकांडे यांनीही लेसर लाईट्सवर बंदी घालण्याची मागणी निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे केली होती. तक्रारींचा वाढता ओघ आणि लेसर लाईट्चा धोका लक्षात घेऊन अखेर अपर जिल्हा दंडाधिकारी संजय तेली यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ (१) नुसार गणेश विसर्जन मिरवणुकीत लेसर लाईट्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी दुपारी बंदी आदेश जारी करण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post