महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग विभागाचे आयुक्त अविशांत पांडा यांनी दि इचलकरंजी पॉवरलुम विव्हर्स को-ऑप.असोसिएशनला दिली सदिच्छा भेट
महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग विभागाचे आयुक्त मा.अविशांत पांडा यांनी दि इचलकरंजी पॉवरलुम विव्हर्स को-ऑप.असोसिएशनला सदिच्छा भेट दिली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ.राहुल आवाडे, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांच्यासह वस्त्रोद्योग विभागातील तांत्रिक अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ.राहुल आवाडे यांच्या हस्ते मा.पांडा यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करणेत आला. यानंतर अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी असोसिएशनच्या कामकाजाबद्दल माहिती देऊन सध्या यंत्रमाग उद्योजकांना येत असलेल्या अडचणींबाबतचे निवेदन देऊन अध्यक्ष पाटील यांनी दि. ०८ मार्च २०२४ रोजी मा.मुख्यमंत्री यांनी कोरोची येथे झालेल्या मेळाव्यामध्ये २७ एच.पी. खालील यंत्रमागधारकांना वीज दरात प्रति युनिट रू. १ व २७ एच.पी. वरील यंत्रमागधारकांना वीज दरात प्रति युनिट ७५ पैसे अतिरिक्त वीज सवलत जाहिर केलेली होती. त्याचा शासन निर्णय दि. १५ मार्च २०२४ रोजी काढणेत आला. त्यामध्ये सवलत मिळणेसाठी ऑनलाईन व ऑफ लाईन नोंदणीची अट घालणेत आली आहे. ती अट काढून टाकणेत यावी. साध्या यंत्रमागाची ५% व्याज सवलत २०१८ - २३ या आर्थिक वर्षात सर्वांना मिळालेली नाही. ती सोप्या पद्धतीने मागणी अर्ज घेऊन ऊर्वरीत सर्व यंत्रमागधारकांना मिळावी. आणि ती बँका व वित्तीय संस्थांच्या सर्व प्रकारच्या (मुदत कर्ज व खेळते भांडवल) जून्या व नव्या कर्जासाठी असावी. थकीत व एन.पी.ए. मध्ये गेलेल्या कर्जाचा समावेश या योजनेत करेणेत यावा. तसेच या योजनेचा समावेश २०२३ - २८ या नविन वस्त्रोद्योग धोरणातही करण्यात यावा. अस्तित्वात असलेल्या शटललेस लुमसाठी २% व्याज सवलत सुरू करणेत यावी. नविन वस्त्रोद्योग धोरणामध्ये साध्या यंत्रमागाचा समावेश करणेत यावा. आणि साध्या यंत्रमागांनाही अनुदान देणेत यावे. नोंदणी न केलेल्या यंत्रमागधारकांच्या वीज बिलात आलेली पोकळ थकबाकीवरील व्याज व दंड व्याज निर्लेखीत करणेत यावे. व ज्यांच्याकडून जबरदस्तीने भरून घेतलेले आहे. ते परत मिळावे. महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीकडे सर्व यंत्रमागाच्या जोडणीची नोंद आहे. तसेच महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीकडे यंत्रमागाच्या वेगळ्या वर्गवारी व ट्रान्स्फार्मर नुसार नोंद आहे. ती ग्राह्य धरून पुन्हा नव्याने ऑनलाईन नोंदणीची सक्ती केली जाऊ नये. पुर्वीप्रमाणे मागेल त्याला मल्टीपार्टी व एकाच शेडमध्ये अनेक कनेक्शन देणेत यावेत. यंत्रमाग कामगारांच्यासाठी वेगळे कामगार कल्याण मंडळ स्थापन करावे. त्याचप्रमाणे सुतावर प्रति किलो १ रूपये याप्रमाणे सेस लावून यंत्रमाग कामगारांना सर्व सवलती यामार्फ त देणेत याव्यात. यातून कामगारांना प्रा.फंड, ग्रॅच्युईटी, पेंशन, ई.एस.आय. व बोनस दिला जावा. या सर्व मागण्यांसाठी आपण सरकार दरबारी प्रयत्न करावेत अशी विनंती केली. सदर कार्यक्रमास असोसिएशनचे उपाध्यक्ष रफिक खानापूरे, संचालक राजगोंडा पाटील, सोमाण्णा वाळकुंजे, चंद्रकांत भोपळे, पांडूरंग सोलगे, सुभाष बलवान, दत्तात्रय टेके, किरण पोवार, राजाराम गिरी, संचालिका श्रीमती हमिदा गोरवाडे, सौ.महादेवी खोत, साधे माग संरक्षण समितीचे विश्वनाथ मेटे, कोल्हापूर जिल्हा पॉवरलुम असोसिएशनचे दिपक राशिनकर, यंत्रमागधारक जागृती संघटनेचे सुरज दुबे, किशोर पाटील यांच्यासह कारखानदार उपस्थित होते.