आगामी गणेशोत्सव शहरवासियांना अत्यंत चांगल्या उत्साही आणि आनंदी वातावरणात साजरा करता यावा यासाठी सर्वच शासकीय यंत्रणांनी एकमेकांशी योग्य पध्दतीने समन्वय साधून काम करावे, असे आवाहन आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी केले. पुढील महिन्यात 19 सप्टेंबरपासुन गणेशोत्सवास सुरुवात होत आहे. इचलकरंजी शहरात सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने शहरात कायदा व सुव्यवस्थेचे पालन करत शहरवासियांना आनंदी व उत्साही वातावरणात गणेशोत्सव साजरा करता यावा यासाठी महापालिका, पोलिस व महसूल प्रशासनासह संबंधित प्रशासकीय यंत्रणांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे आणि अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेली होती. यावेळी आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी, गणेशोत्सव शहरातील सर्वच नागरिकांना आनंदी व उत्साही वातावरणात साजरा करता यावा यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी योग्य पध्दतीने एकमेकांशी समन्वय साधून काम करावे. तर श्रीं चे आगमन आणि विसर्जन मार्गावरील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती तातडीने करण्याचे आदेश देत आगमन आणि विसर्जन मिरवणुक मार्गावरील अडथळा निर्माण होत असलेल्या विद्युत तारांची उंची आवश्यकतेनुसार वाढविण्यासाठी महावितरण चे प्रतिनीधी आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखा यांचेशी समन्वयक साधून कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या. गणेशोत्सव कालावधीत मोठ्या संख्येने नागरिक देखावे तसेच गणेश मूर्ती पाहण्यासाठी बाहेर पडत असल्यामुळे मुख्य मार्गासह अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यामुळे शहरातील मुख्य गर्दीच्या ठिकाणी नागरिकांच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्याच्या सूचनाही आयुक्त दिवटे यांनी केल्या. अप्पर पोलीस तर अधिक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांनी, गणेशोत्सव सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी दक्षता घेणेच्या सुचना दिल्या. बैठकीस पोलीस उप अधिक्षक समीरसिंह साळवे, उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, अप्पर तहसीलदार मनोजकुमार ऐतवडे, सहाय्यक आयुक्त केतन गुजर, पोलिस निरीक्षक सत्यवान हाके, राजु ताशिलदार, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे राजीव पाटील, कामगार अधिकारी विजय राजापुरे, संजय बागडे, महेंद्र क्षिरसागर, डॉ.अमित सोहणी, संदीप जाधव, सचिन पाटील, बसस्थान आगारप्रमुख सागर पाटील, सुनिल बेलेकर, नितिन बनगे, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता रमेश कदम आदी उपस्थित होते.