संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजना पात्र लाभार्थ्यांना दरमहा 1500 रु मिळणार

 संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना अंर्तगत सर्वच लाभार्थ्यांच्या अनुदानात केलेल्या 500 रुपये वाढ संदर्भातील अध्यादेश राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने जारी करण्यात आला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना आता 1 हजार रुपये ऐवजी दरमहा 1500 रुपये अनुदान मिळणार आहे. या प्रश्‍नासंदर्भात आमदार प्रकाश आवाडे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याने लाभार्थ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. विधवा, परितक्त्या, कुष्ठरोगी, एआयव्हीबाधित, तृतीयपंथी, निराधार वृध्द, देवदासी आणि अंध-अपंग अशा विविध आर्थिक स्तरावर पिचलेल्या गोरगरीब लोकांसाठी शासन विविध योजना राबवत आहे. त्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजनांचा समावेश आहे. संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा दिल्या जाणार्‍या अनुदानात वाढ करण्यात यावी या संदर्भात आमदार प्रकाश आवाडे यांनी शासन दरबारी मागणी करुन पाठपुरावा सुरु ठेवला होता. त्याचबरोबर मार्चमध्ये झालेल्या संगांयो लाभार्थ्यांच्या मेळाव्यात अनुदानात वाढ करण्यासह ते दरमहा मिळावे यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही दिली होती. त्याचीही वचनपूर्ती यानिमित्ताने झाली आहे. राज्य शासनाने सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संजय गांधी व श्रावणबाळ योजनेतील पात्र लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्य 1 हजारवरुन 1500 रुपये करण्याचा म्हणजेच अनुदानात 500 रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली होती. तर 28 जून रोजी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत त्यास मान्यता दिली होती.त्यानुसार 5 जुलै रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना अंतर्गत सर्वच लाभार्थ्यांचे अनुदान 1 हजारवरुन 1500 रुपये करण्यात येत असल्याचा अध्यादेश कार्यासन अधिकारी प्रशांत पुं. वाघ यांनी जारी केला आहे.















Post a Comment

Previous Post Next Post