अभिषेक पाटील यांचा आप च्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा ; महाराष्ट्रात पक्षाचे धोरण स्पष्ट नसल्याने घेतला निर्णय
आम आदमी पार्टीचे माजी जिल्हा युवा उपाध्यक्ष व इचलकरंजी शहरातील आप चे सक्रिय काम करणारे अभिषेक पाटील यांनी रविवार दि.1 डिसेंबर रोजी आप च्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. दिल्ली राज्यात आप चे कार्य कौतुकास्पद असून, अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया व इतर इतर नेत्यांचा सदैव सन्मान करणार पण महाराष्ट्र राज्यात आप चे धोरण नसल्याने व पक्षाच्यावतीने कोणतेही धोरणात्मक निर्णय होत नसल्याने, केवळ महाविकास आघाडीला पाठिंबा देऊन पक्ष निष्क्रिय राहिल्यामुळे सदर राजीनामा देत असल्याचे पाटील यांनी नमूद केले.संविधान दिनापर्यंत प्रदेश कार्यकारी अध्यक्ष यांचेकडे महाराष्ट्रातील आप चे धोरण स्पष्ट करण्याची मागणी केली असता, कोणतेही स्पष्टीकरण अथवा आगामी काळातील भूमिका प्रदेश कार्यकारी अध्यक्ष यांनी स्पष्ट केली नसल्याने, पाटील हे सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असल्यामुळे सर्व सामान्यांची सेवा व नागरी समस्या सोडविणे हेच कर्तव्य असल्यामुळे, पक्षाच्या माध्यमातून निष्क्रिय राहणे संभव नसून, आप ची महाराष्ट्रात दिशाहीन वाटचाल ही सर्व सामान्यांच्या विकासासाठी घातक असून, निर्णय घेतल्याचे देखील पाटील यांनी स्पष्ट केले. इचलकरंजी शहर व परिसरातील विविध नागरी समस्यांवर पाटील यांनी आवाज उठवला असून त्यात प्रामुख्याने महापालिका शाळा, पानी प्रश्न, पंचगंगा नदी प्रदूषण प्रश्न, कचरा डेपो प्रदूषण प्रश्न,स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम, शेतकरी-कष्टकऱ्यांचे प्रश्न, सार्वजनिक उद्यान-मैदान सुशोभीकरण, सार्वजनिक बोर प्रश्न, शिक्षकांच्या समस्या व इतर प्रश्नांवर काम केले आहे.