लबाडांचं ऐकून कुणालाही मतदान करू नका : माजी खासदार राजू शेट्टी

लबाडांचं ऐकून कुणालाही मतदान करू नका, नरंदे येथील डॉ.मिणचेकर यांच्या सभेत मा.खासदार राजू शेट्टी यांनी केले मतदारांना आवाहन 


साखर कारखानदार इतर सर्वच निवडणुकीत एकमेकांविरुद्ध भांडतात. पण शेतकऱ्याला उसाचे बिल देताना एक होत्यातं. ह्या लबाडांचं ऐकून कुणालाही मतदान करू नका. मागील निवडणुकीत निवडून दिलेले आमदार राजूबाबा आवळे यांनी सभागृहात कधीही तोंड सुद्धा उघडलं नाही. आत्ता मात्र विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बिल्ला लावलेला आमदार डॉ.सुजित मिणचेकर बोलतील तसेच ते शेतकऱ्यांची धुनी सभागृहात धुतील तरी मिणचेकर यांच्या शिट्टी चिन्हा समोरील बटन दाबून विजयी करण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले. नरंदे तालुका हातकणंगले येथील परिवर्तन महाशक्तीच्या स्वाभिमानी सभेत डॉ.सुजित मिणचेकर यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. 

मा.खासदार शेट्टी पुढे म्हणाले, २०११ साली एफआरपीचा कायदा लोकसभेत मंजूर  करून घेण्यात माझा सिंहाचा वाटा आहे . त्यासाठी उत्तर प्रदेश व बिहारसह अन्य राज्यातील घटक पक्षांच्या खासदारांना घेऊन लोकसभेचे कामकाज सहा दिवस बंद ठेवले होते . त्यावर सभागृहाला एफआरपीचा कायदा अंमलात आणावा लागला. त्या कायद्याला नख लावण्याचे काम आत्ताचे सरकार करीत आहे. तरी त्याला विरोध करण्यासाठी विधानसभेत आपल्याला हक्काचा आमदार डॉक्टर मिणचेकर यांना पाठवूया. यावेळी माजी खासदार शेट्टी यांनी डॉक्टर सुजित मिणचेकर २०२४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत निवडून येणारच ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ असल्याचे सांगितले. प्रचारसभेत डॉक्टर सुजित मिणचेकर, पुरंदर पाटील, शिवाजी पाटील, यांच्यासह अन्य वक्त्यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी आप्पासो एडके, नरंदेचे माजी सरपंच रवींद्र अनुसे, पिंटू पाटील, अरुण मगदूम यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे, शिवशक्ती व भीमशक्तीचे पदाधिकारी-कार्यकर्ते, मिणचेकर प्रेमी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post