एका निर्भया प्रकरणामुळे सत्तांतर घडले होते हा इतिहास राज्यकर्त्यांना नजरेआड करुन चालणार नाही. महिला, अन्याय, अत्याचाराच्या घटनांचा अहिंसेच्या मार्गाने विरोध करु. राज्यकर्ते त्याची दखल घेणार नसतील तर लोकशाही मार्गाने त्यांना धडा शिकवु, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजु शेट्टी यांनी दिला. गुरुवारी सकाळी विरपत्नींच्या हस्ते सरबत घेऊन शेट्टी यांनी या आंदोलनाची सांगता केली. गांधी चौकात माणिपूरात महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ 72 तास आत्मक्लेश-अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनाच्या सांगतावेळी ते बोलत होते. शेट्टी म्हणाले, देशभर महिलांवर अन्याय, अत्याचार होत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने संबंधित राज्यांना समज दिली पाहिजे. केंद्र सरकारने नागरिकांचे रक्षण करण्याची जबाबदारी पार पाडावी अन्यथा देशात कुठेही महिलांवर अत्याचार होत असतील तर ते खपवून घेणार नाही, असा इशारा दिला. तसेच मणिपूर अत्याचारप्रकरणी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांच्याकडं पत्राद्वारे नाराजी व्यक्त केल्याचेही त्यांनी सांगितले. केंद्र सरकार देशातील महिला, अल्पसंख्याकांच्या रक्षणासाठी सक्षम नसेल तर महिलांनी घाबरू नये, आम्ही रक्षणासाठी तयार आहोत, हा विश्वास देण्यासाठी सत्याग्रह आंदोलन केल्याचेही त्यांनी सांगितले आहे. यावेळी जालंदर पाटील, विकास चौगुले, हेमंत वणकुंद्रे, बसगोंडा बिरादार, आण्णासाहेब शहापुरे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान बुधवारी सायंकाळी मुख्यमार्गावरून कॅण्डल मार्च काढण्यात आला. यामध्ये मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या.
Tags
राजकीय बातम्या