गंगामाईची माजी विद्यार्थिनी प्रीती करवा राज्य क्रीडा मार्गदर्शकपदी ; या पदावर पोहोचणारी इचलकरंजीतील पहिली खेळाडू
इचलकरंजी येथील श्री.ना.बा.एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व जुनिअर कॉलेजची माजी विद्यार्थिनी, राष्ट्रीय कबड्डी व खो-खो खेळाडू कु. प्रीती संजयकुमार करवा हिची महाराष्ट्र शासनातर्फे खो-खो व कबड्डी खेळाच्या राज्य मार्गदर्शकपदी निवड झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण 1179 उमेदवारांनी या पदासाठी परीक्षा दिलेली होती, त्यातून 92 क्रीडा मार्गदर्शकांची निवड करण्यात आली, ज्यामध्ये प्रीतीचा समावेश आहे. आधीपासून खो-खो खेळणाऱ्या प्रीतीने श्रीमंत गंगामाई प्रशालेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर प्रा.शेखर शहा यांच्या मार्गदर्शनाखाली कबड्डीचे धडे गिरविले. शहा सरांनी प्रीतीच्या अंगभूत गुणांचा विकास करीत तिला अव्वल दर्जाची कबड्डी खेळाडू बनविले. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तिची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली होती. त्याचबरोबर कोल्हापूर खो-खो असोसिएशनच्या संघातून ती राष्ट्रीय खो-खो स्पर्धा सुद्धा खेळलेली आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स, पतियाळा या केंद्र शासनाच्या संस्थेचा खो-खो खेळासाठीचा क्रीडामार्गदर्शकाचा डिप्लोमा तिने पूर्ण केला आहे. राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी कोल्हापूर खो-खो असोसिएशनच्या सब-ज्युनिअर संघाच्या आणि खेलो इंडिया स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य खो-खो संघाच्या प्रशिक्षकपदी तिने उत्कृष्ट कार्य केले आहे. तिच्या या साऱ्या कामगिरीचा विचार होऊन आणि लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेत उत्तम गुण संपादन केल्यामुळे तिची सरळ शासकीय सेवेत भरती झाली आहे. सर्वसामान्य घरातून येणाऱ्या प्रीतीच्या निवडीबद्दल प्रीतीचे सर्व थरातून अभिनंदन करण्यात येत असून श्री.ना.बा.एज्युकेशन सोसायटीचे प्रेसिडेंट श्रीनिवास बोहरा, चेअरमन श्री.कृष्णाजी बोहरा, व्हाईस चेअरमन श्री उदय लोखंडे, खजिनदार श्री राजगोपाल डाळ्या, मानद सचिव श्री बाबासाहेब वडिंगे, स्कूल कमिटी चेअरमन श्री मारुतराव निमणकर, विश्वस्त श्री अहमद मुजावर, विश्वस्त श्री महेश बांदवलकर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस.एस.गोंदकर, उपमुख्याध्यापिका सौ.एस.एस.भस्मे पर्यवेक्षक, श्री व्ही.एन.कांबळे, पर्यवेक्षक श्री एस.व्ही.पाटील, क्रीडाशिक्षक डॉ.राहुल कुलकर्णी यांनी प्रीतीचे अभिनंदन केले.